Retirement Planning: वयाच्या ३० व्या वर्षी SIP सुरू करून मिळवा ५ कोटींचा फंड, समजून घ्या सोपे गणित!
आजच्या वाढत्या महागाईच्या काळात प्रत्येकाला आपले आर्थिक भविष्य सुरक्षित करायचे असते. निवृत्तीनंतर (Retirement) कुणापुढेही हात पसरावे लागू नयेत, यासाठी योग्य वेळी गुंतवणुकीला सुरुवात करणे अत्यंत गरजेचे आहे. म्युच्युअल फंडमधील ‘SIP’ (Systematic Investment Plan) हा एक असा प्रभावी मार्ग आहे, जिथे तुम्ही अगदी छोट्या रकमेपासून आणि कधीही गुंतवणुकीची सुरुवात करू शकता.
जर तुमचे वय सध्या ३० वर्षे असेल आणि निवृत्तीपर्यंत म्हणजेच वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत तुम्हाला स्वतःसाठी ५ कोटी रुपयांचा फंड उभा करायचा असेल, तर हे गणित खास तुमच्यासाठी आहे.
५ कोटींचा फंड कसा उभा राहील?
तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी तब्बल ३० वर्षांचा मोठा कालावधी आहे. म्युच्युअल फंड दीर्घकाळात सरासरी १२% परतावा (Return) देतात असा आजवरचा इतिहास आहे. अर्थात, ही गुंतवणूक शेअर बाजाराशी निगडीत असल्याने यात थोडे चढ-उतार असू शकतात.
५ कोटींचे टार्गेट पूर्ण करण्याचे गणित:
- दरमहा SIP गुंतवणूक: ₹१७,०००
- अंदाजित परतावा: १२%
- गुंतवणुकीचा कालावधी: ३० वर्षे
- ३० वर्षांतील तुमची एकूण गुंतवणूक: ₹६१,२०,०००
- ३० वर्षांनंतर मिळणारी अंदाजित रक्कम: ₹५,२३,७६,५४५ (५.२३ कोटी)
या कॅल्क्युलेशनवरून हे स्पष्ट होते की, तुम्ही साठवलेल्या ६१ लाख रुपयांवर तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा (Compound Interest) असा फायदा मिळतो की तुमचे टार्गेट ५ कोटींच्याही पुढे जाते.
१७ हजारांची गुंतवणूक शक्य नसेल तर काय करावे?
प्रत्येकाला सुरुवातीलाच दर महिन्याला १७,००० रुपये बाजूला काढणे शक्य नसते. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही गुंतवणूक करू शकत नाही. दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी (wealth accumulation) ‘Step-Up SIP‘ हा एक अत्यंत शिस्तबद्ध आणि स्मार्ट मार्ग आहे. समजा, तुम्ही दर महिन्याला ६,५०० रुपयांची SIP सुरू केली आणि दरवर्षी त्यात १०% वाढ (Step-Up) करत गेलात, तरीही तुमच्या गुंतवणुकीत एक मोठा चमत्कार घडू शकतो.
६,५०० रुपये + १०% Step-Up गुंतवणुकीचे गणित:
- सुरुवातीची दरमहा SIP: ₹६,५००
- वार्षिक Step-Up (वाढ): १०% (म्हणजे दरवर्षी तुम्ही तुमच्या SIP च्या रक्कमेत १० टक्क्यांची वाढ कराल)
- अंदाजित परतावा: १२%
- गुंतवणुकीचा कालावधी: ३० वर्षे
- ३० वर्षांतील तुमची एकूण गुंतवणूक: जवळपास ₹१,२८,३०,५३४ (१.२८ कोटी)
- ३० वर्षांनंतर मिळणारी अंदाजित रक्कम:सुमारे सुमारे ₹५,१९,०७,५४६ (५.१९ कोटी)
महिन्याला केवळ ६,५०० रुपयांपासून सुरुवात करून आणि दरवर्षी आपल्या वाढत्या उत्पन्नासोबत गुंतवणुकीची रक्कम १० टक्क्यांनी वाढवून, तुम्ही ३० वर्षांत तुमचे ५ कोटींचे टार्गेट सहज गाठू शकता. यामुळे सुरुवातीच्या काळात तुमच्यावर पैशांचा ताणही येणार नाही आणि महागाईला (Inflation) मात देणे सोपे जाईल.
गुंतवणूक करताना या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा:
- तुमची जोखीम घेण्याची क्षमता ओळखा: प्रत्येकाची आर्थिक स्थिती वेगळी असते. जर तुम्ही मार्केटमधील चढ-उतार सहन करू शकत नसाल, तर FD किंवा PPF सारख्या सुरक्षित पर्यायांचा विचार करा.
- तुमचे ध्येय निश्चित करा: जर तुम्हाला ५ वर्षांनंतर पैसे हवे असतील, तर इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे योग्य नाही. कालावधीनुसार योग्य फंड निवडा.
- अतिरिक्त पैसा गुंतवा: ज्या पैशांची तुम्हाला नजीकच्या भविष्यात गरज लागणार नाही, अशीच रक्कम म्युच्युअल फंडमध्ये गुंतवा.
डिस्क्लेमर: म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. हा लेख केवळ माहितीसाठी आहे. कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या प्रमाणित आर्थिक सल्लागाराचा (Financial Advisor) सल्ला नक्की घ्या.









One Comment